उशीर
आज शुक्रवार. नेहमी पेक्षा कामाचा भार आज जरा जास्तच आहे. घड्याळाकडे पहायला सुद्धा वेळ नव्हता. मैफलीत पेटी वाजवल्या प्रमाणे सगळ्यांचे हात कीबोर्ड वर चालत होते. "सोनिया!,अगं वाजले बघ किती? घरी नाही जायचंय का तुला?", मानसी चा आवाज एकदम कानी पडला. "माझं काम थोडंच राहिलंय, जर मी आज ते कंप्लीट नाही केलं तर मॅडम माझा जीव घेतील. तू जा मी लगेच निघते काम संपल्यावर." "बरं नीट जा घरी आणी पोचल्यावर मेसेज कर नक्की." मी पटकन पाण्याचा घोट घेत घड्याळाकडे पाहिले तर साडे नऊ वाजून गेले होते. माझं लक्ष मोबाईल वर गेलं, भरपूर मिस्ड कॉल्स दिसत होते. मी आई ला मेसेज टाकला की, 'मला आज उशीर होईल, तुम्ही जेऊन घ्या'.
एका मागोमाग एक सगळे काम संपवून निघू लागले होते. शेवटी साडे दहाच्या सुमारास माझं काम संपलं आणी मी निघाले. घरी फोन लावायला मोबाईल काढला तर रोहन चे पाच मिस्ड कॉल्स होते. मी घरी फोन करून लगेच रोहन ला फोन लावला. लिफ्ट चे बटण दाबून त्याची फोन उचलण्याची वाट पाहू लागली. खाली येईस्तोवर त्यानी काही फोन उचलला नव्हता. मी बाहेर रस्त्यावर पाहते तर सगळंच एकदम शांत झालं होतं. शुकशुकाट कानात गुंगत होता. मी पुढे चालत रिक्षा बघायला सुरुवात केली. तेवढ्यात माझा फोन वाजला. मी जवळ जवळ उडालेच.
"काय रे रोहन! घाबरवलस"!
"सोनू कुठे आहेस तू, किती फोन केले तुला, उचलला का नाहिस?,
"अरे मी आता निघाले आहे घरी ऑफीस मधून, सॉरी मी बिझी होते."
"काय सांगतेस काय सोनू? बरं मघ काही रिक्षा, बस मिळाली आहे का?"
"नाही रे, अजून शोधते आहे. मिळेल इतक्यात."
"बरं व्यवस्थित जा घरी, मी तुला नंतर फोन करतो, मी जरा मित्रां बरोबर आहे."
"बरं, तू सुध्दा घरी पोहोचल्यावर मला कळव."
"हो मॅडम, जशी तुमची इच्छा!"
"चल, मी पोहोचले की मेसेज करते, गुड नाईट."
मी पहिल्यांदाच इतक्या उशिरा घरी चालले होते, मनात थोड़ी भिती होतीच पण मी स्वतःची काळजी घेण्या इतपत नक्कीच धीट होती. कॉलेज मधे असताना मार्शीयल आर्ट्स क्लास जॉईन केला होता. काही वेळाने एक रिक्षा मिळाली. स्टेशन पर्यंत पोहोचण्याची आता काळजी मिटली होती.
जरा पुढे नाक्या जवळ रिक्षा एकदम थांबलीच. मी गडबडून ड्राइवर कडे पाहिले. "काय झालं काका, रीक्षा का थांबवली?"
"ओ मैडम, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, बघायला हवं.", असं म्हणत ते रिक्षावाले काका खाली उतरले.
रात्रीचे ११ वाजले होते आणि भूक पण लागली होती. कधी एकदा घरी जातेय असं झालं होतं. जवळ जवळ पंधरा मिनिटं उलटून गेली तरी नक्की काय प्रॉब्लेम झाला होता हे कळतच नव्हतं. आता मात्र माझा पारा चढत होता. "काका, नक्की काय झालयं. अजून किती वेळ लागेल?", मी रागात विचारलं.
"काही सांगता येत नाही पोरी, बहुतेक मदत घ्यावी लागेल मेकॅनिकची."
"ओ गॉड! मला अजून जास्त वेळ थांबता नाही येणार इथे, मी लांब राहते आणि लवकरात लवकर मला ट्रेन पकडायची आहे." मी आता रिक्षातून उतरले होते. स्टेशन अजून लांब होतं. मी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि भराभर पावले टाकत पुढे निघाले. समोर नुसता रिकामा रस्ता आणि भयाण शांतता पाहून थंडीत घाम फुटत होता. का कोण जाणे अश्या वेळी मला मनात भलते विचार येऊ लागले होते. आज सकाळी आई म्हणाली होती की लवकर नीघ कारण आज अमावस्या आहे. सहज म्हणून मी मागे वळून पाहिले तर मागचा रस्ता धुक्यात पार हरवून गेला होता. परत पुढे पाहिले तर समोरून काहीतरी वेगाने सरकल्या सारखे जाणवले. माझ्या सर्वांगावर रोमांच उठला. काळी सावली होती की माझा भास होता काही कळायला मार्ग नव्हता. थोडं पुढे चालत गेली तोच मागून कोणीतरी चालतय असा आवाज ऐकू आला. माझी पावले जशी थांबली तसाच तो आवाजही थांबला. पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली तर तसच जाणवलं. आता मात्र मी घाबरले होते आणि माझा चालण्याचा वेग वाढवला, तो आवाज पण वाढला. माझी हिम्मत होईना मागे वळून पाहण्याची. मी पळत सुटले आणि रस्त्याच्या कडेच्या एका छोट्या जंगला सारख्या वाटेवर घुसले. बराच वेळ पळल्यावर कळलं की मी चुकीच्या रस्त्यावरून चालली आहे. नुसती घनदाट झाडे नजरे समोर दिसत होती. मी फोन करायला मोबाईल काढला तर नेटवर्क गेला होता आणि घाईत निघण्याच्या नादात मी मोबाईल पण चार्ज नव्हता केला.
त्या घनदाट जंगलातून वाट काढत मी पुढे सावकाश पावलं टाकत होती. मोबाईलचा लाइट पुढे धरला होता. तेवढ्यात माझ्या मागून कोणीतरी जोरात श्वास घेत असल्याचे मला जाणवले. मी पटकन मोबाइल चा लाइट त्या दिशेने भिरकावला तर काहीतरी विचित्र आवाजात किंचाळत दूर पळाले. तो आवाज अमानुष होता, मला कळून चुकलं की हे काहीतरी भलतंच घडतय माझ्या बरोबर. ती काळी सावली की कोणी प्राणी होता हे कळत नव्हते. मी धीर एकवटून पुढे चालत राहिले. सगळ्या बाजूनी मोबाईलचा लाइट पसरवत चालत राहिले. पुढे चालण्याच्या नादात किती वेळ झाला ह्याचं भान नाही राहिलं आणि अचानक मोबाईल चा लाइट बंद झाला. मोबाईल आता स्विच ऑफ झाला होता. मला दरदरून घाम फुटला आणि मी वेगाने त्या अंधारात पुढे जसे जमेल तसे पटपट चालू लागली. अचानक कशावर तरी आपटले, ते काहीतरी वेगळच होतं, उंच धिप्पाड अंग, मोठा उभट चेहरा, लाल चमकणारे डोळे, मोठे बाहेर आलेले टोकदार दात आणि संपूर्ण शरीरावर नुसती काळी कातडी पसरली होती. ते मानवी शरीर असणं अशक्य होतं. त्या घाबरलेल्या अवस्थेत मी 'त्याला' ढकलून पुढे पळू लागले आणि स्वतःचा जीव मुठीत घेऊन जिवाच्या आकांताने ओरडत किंचाळत होते. 'तो' मझा पाठलाग करत होता. त्याच्या पायांच्या आवाजाने माझे ह्रुदय अजून धधडत होते. समोर सगळं अंधुक दिसत असतानाही मी वेगात पळत राहिले आणि शेवटी झाडत पाय अडकून पडले. उजवा पाय आखड्ला होता, मी जमीनीवर बसून राहिले आणि विचार करू लागले की काही गोष्टी ह्या जगात अश्या असतात ज्या समजण्याचा पलीकडे असतात. माझा चांगलाच विश्वास बसला होता. 'तो' जो कोणी होता भूत, पिशाच्च किवा राक्षस त्याच्या शक्तीचा अंदाज मला फारसा नव्हता पण त्याचा वीक पॉईंट हा उजेड असावा असे लक्षात आले. मी उठणार इतक्यात पुन्हा त्याच्या पायांचा आवाज ऐकू आला आणि भितीने मी देवाचा धावा करू लागले. मला माहीत असलेले सगळी देवांची नावे मी जोरजोरात घेऊ लागले आणि तशीच पुन्हा वाट काढत पळू लागले. आता 'त्याचा' वेग मात्र वाढला होता. 'तो' माझ्या बरोबरीने धावत होता आणि मला पकडण्याचा प्रयत्न करत होता. 'त्याचा' स्पर्श टाळायच्या नादात माझा तोल जाऊन मी पुन्हा पडले. पण मी थांबली नाही.
बराच वेळ पळून पायांची हाडे ठिसूळ झाली की काय असे वाटू लागले आहे. भूक तहान सगळी हरपली आहे आणि अंगातला त्राण सुद्धा आता निघून जाईल. मला कसेही करून इथून निघायचे आहे असा पक्का निश्चय मनाशी केला आणी पुढे चालत राहिले. घड्याळात आता सकाळचे साडे पाच वाजले होते. लवकरच सूर्योदय होईल असे दिसते आहे. क्षणभर माझ्या कुटुंबाचे स्मरण केले. सगळ्यांचा हसतमुख चेहेरा डोळ्यांसमोर तरळत होता. पुन्हा मी त्यांना भेटू शकीन का? ह्या विचारानेच घाम फुटत होता. संपूर्ण वातावरण शांत होतं, माझ्या ह्रूदयाचे ठोके सुद्धा ऐकू येत होते, तेवढ्यात मला काहीतरी जाणवले, कोणीतरी वेगाने आपल्या दिशेने पळत येत असताना दिसले आणी क्षणातच 'त्याने' मला जवळ जवळ ओर्बाडत खाली जमिनीवर ढकलले. मला उठता येत नव्हते, माझ्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती बहुदा. पुन्हा मला पावलांचे आवाज ऐकू आले. मी डोळे त्या दिशेला वळवले आणी संपूर्ण अंग थरारून उठले. 'तो' आता माझ्या उजवीकडे उभा होता. 'त्याचे' अस्तित्व मला काहीच हालचाल करू देत नव्हते. त्याचे लाल डोळे आता माझ्यावर रोखले होते. 'तो' जवळ येऊ लागला होता.भीतीने पार रक्त गोठले होते. शिकार झालेल्या प्राण्या सारखी मी पडून होते, मरणाची वाट पाहात. 'तो' आता माझ्या इतक्या जवळ आला होता की त्याचा बीभत्स चेहरा आता स्पष्ट दिसत होता. 'त्याने' माझा हात धरला आणी स्वतःचा जबडा उघडत माझा हात त्याच्या तोंडापाशी नेला. एखादे दार खूप दिवसांनी उघडताना जसा आवाज येतो तसाच त्याचा जबडा उघडल्यावर आला.....
'तो' माझ्या हाताचा चावा घेईल तितक्यात सूर्याची प्रखर किरणे एकदम डोळ्यांना भिडली आणी माझे डोळे बंद झाले. 'तो' दूर गेल्याचे मला जाणवले. प्रकाश हा त्याचा वीक पॉइंट आहे हे मला समजले होते म्हणून मी त्याला मधोमध घेऊन आले होते. मी माझी सगळी शक्ती एकवटून उठून उभी राहिली आणी आता सगळीकडे उजेड पडताना दिसत होते. 'तो' आता मागे मागे सरकत विचित्र आवाजात काहीतरी पुटपुटल्या सारखं करत होता. थोड्याच वेळात सगळीकडे लक्ख उजेड पडला होता आणी तो आता विव्हळत होता, त्याचे ते काळेभोर शरीर भाजून निघाले होते, काही क्षणातच त्याच्या शरीराने पेट घेतला. 'त्याचा' तो कर्कश आवाज मला माझे कान बंद करायला भाग पाडत होता. जागच्या जागी त्याची राख होताना मला दिसली.
मी देवाचे आभार मानले आणि मी स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरली होती. आता ह्या पुढे मी कधीही उशिरा एकटी बाहेर नाही पडणार. कानाला खडा, हा विचार करता करताच तोल जाऊन पडले. समोर नुसती झाडेच झाडे दिसत होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानी जाणवला. तेवढ्यात मला माझ्या बाजूला हालचाल जाणवली. समोर काही पोलीस होते आणी त्यांच्या बरोबर माझे बाबा आणी रोहन उभे होते. रोहन ने झटकन मला उचलले आणी गाडी पाशी चालत नेऊन मला गाडीत ठेवले. रोहन म्हणाला की माझ्या मोबाईल लोकेशन वरून त्यांनी मला शोधले. माझ्या बरोबर झालेला प्रकार त्यांना सांगितला तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. मी आता सुखरूप आहे ह्याची मला खात्री पटली होती आणि जीवात जीव आल्या सारखे वाटले...
Bạn đang đọc truyện trên: AzTruyen.Top